*येवला बाह्य वळण रस्त्यांच्या कामाला गती द्या - मंत्री छगन भुजबळ*
*कोपरगाव येवला मनमाड रस्ता येवला शहराच्या बाहेरून करण्याबाबत योग्य अभ्यास करावा - मंत्री छगन भुजबळ*
*नाशिक,दि.२१ ऑगस्ट:-* कोपरगांव - येवला - मनमाड - मालेगाव या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. सदर रस्ता येवला बाह्यवळण रस्त्याला कनेक्ट करून शहराच्या बाहेरून करण्याबाबत योग्य तो अभ्यास करावा. तसेच या मार्गाची निश्चिती करून या रस्त्याच्या कामाला गती देण्यात यावी अशा सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्याना दिल्या.
मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथील कार्यालयात येवला बाह्य रस्त्याच्या कामाबाबत आढावा घेतला. त्यावेळी ते सबंधित अधिकाऱ्यांशी बोलत होते.
यावेळी प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक श्रीकांत ढगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.के.आव्हाड, प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून कुंभमेळा रस्ते विकास कार्यक्रमाअंतर्गत मालेगाव मनमाड येवला कोपरगाव चौपदरी कॉंक्रीट रस्त्याच्या कामाचा समावेश केला आहे.या रस्त्याची एकूण लांबी ७६ किमी असून यासाठी ९६० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.मंत्री छगन भुजबळ या रस्त्याच्या डीपीआर बद्दलची सद्यस्थिती जाणून घेत येवला शहरातील ट्राफिक टाळण्यासाठी येवला शहर बाह्य वळण रस्ता करण्याकरिता योग्य नियोजन करण्यात यावे. तसेच यासाठी आवश्यक भूसंपादन करून घ्यावे अशा सूचना दिल्या.